Shirur News : शिरूर, पारनेरमध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री तीन मंदिरांमधील दानपेट्या फोडून रोकड लंपास
शिरूर तालुक्यात चोरट्यांनी हौदोस घातला असून शिरूर पोलिसांपुढे चोरट्यांनी (Shirur News) मोठे आव्हाण उभे केले आहे. भर दिवसा घरफोड्या, चैन स्नॅचिग, विद्युत रोहीत्र चोऱ्या, दुचाकी चोऱ्या मोठ्या प्रमाणावर होत असून आता मंदीरातील दानपेट्याही सुरक्षित राहील्या नाही.

Shirur News : शिरूर तालुक्यात चोरट्यांनी हौदोस घातला असून शिरूर पोलिसांपुढे चोरट्यांनी (Shirur News) मोठे आव्हाण उभे केले आहे. भर दिवसा घरफोड्या, चैन स्नॅचिग, विद्युत रोहीत्र चोऱ्या, दुचाकी चोऱ्या मोठ्या प्रमाणावर होत असून आता मंदीरातील दानपेट्याही सुरक्षित राहील्या नाही.
शिरूर तालुक्यातील (Shirur News) टाकळी हाजी येथील मळगंगा देवी मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे, पाच चोरट्यांनी एकाच रात्रीत शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दोन मंदिरांना लक्ष्य केले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांनी शिरूर व पारनेर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
मळगंगा देवी मंदिराचे पुजारी रामदास किऱ्हे हे पहाटे पाचच्या सुमारास मंदिर उघडण्यासाठी गेले असता दानपेटी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दानपेटीतील रक्कम बऱ्याच दिवसांपासून काढण्यात आली नसल्याने मोठी रक्कम चोरीला गेल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडली. त्यानंतर टाकळी हाजी कुंड येथील मळगंगा मंदिराला लक्ष्य केले. व नंतर निघोज हद्दीतील मळगंगा मंदिरात चोरी केली.
निघोज येथील मंदिराच्या मंडपात अतुल कारकुड झोपलेला होता. चोरट्यांनी (Shirur News) त्याला जागे करून मंदिराची चावी मागितली. चावी नसल्याचे सांगितल्यानंतर त्याची झडती घेऊन धमकावण्यात आले. त्यानंतर गाभाऱ्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. चार दानपेट्यांपैकी दोन दानपेट्या फोडून रोकड लंपास केली, तर दोन दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला.
निघोज येथील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पाच चोरटे दिसून येत आहेत. चोरटे सुमारे तासभर मंदिरात असल्याचेही फुटेजवरून दिसते. या तिन्ही मंदिरांत यापूर्वीही चोरी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शिरूर व पारनेर पोलिसांनी तपास सुरू केला असून, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. एकाच रात्री तीन मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या पोलिस कधी आवळणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






