Shirur News : सरदवाडी येथे तरुणाची हत्या; दोघांना अटक
शिरूर तालुक्यातील (Shirur News) मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी उशिरा रात्री धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिरूर : शिरूर तालुक्यातील (Shirur News) मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी उशिरा रात्री धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी नितीन उर्फ देवा सुरज चव्हाण (वय २६, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) व गणेश तानाजी सांळुखे (वय १९, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी कोणत्यातरी कारणावरून संतोष बाळासो पवार (वय २४, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात संतोष पवार गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत संतोष पवार यांची पत्नी साधना संतोष पवार (वय २१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयताचा पंचनामा करण्यात आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदनाची (पोस्टमार्टम) प्रक्रिया सुरू आहे. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग अधिक पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे.
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप जप्त करणे बाकी असून त्यासाठी आरोपींकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणामागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करडे व सरदवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.





