Shirur News: एकाच तालुक्यात कायद्याचे दोन वेगळे नियम? निलेश वाळूज यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
Shirur News: तहसील कार्यालयाला प्रतीकात्मक स्वरूपात कुलूप लावून मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

शिरूर: चांडोह (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गेटला कुलूप लावल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ‘दैनिक प्रभात’ने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे यांनी मुख्याध्यापकांना अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले.
मात्र, संपत महादेव वळसे यांनी शाळेला कुलूप लावल्याचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासमोर मान्य करून या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत लेखी माफीनामा सादर केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी हे प्रकरण मिटले असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांना लेखी कळवत गुन्हा दाखल केला नाही.
सध्या माफीनामा दिल्याने प्रशासनाने संबंधितांवर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे, शिरूर शहरातील बायपासवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि यासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूज यांनी तहसील कार्यालयात आंदोलन सुरू केले होते.
तब्बल ११ दिवस आंदोलन करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयाला प्रतीकात्मक स्वरूपात पाच मिनिटे कुलूप लावून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
त्यानंतर त्यांच्यासह इतर पाच जणांवर शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच तालुक्यात साधर्म्य असलेल्या दोन घटनांसाठी कारवाईचे निकष वेगवेगळे का? कायदा सर्वांसाठी समान आहे मग कारवाई वेगवेगळी का? असे सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षकांनी रस्त्यालगत वर्ग भरविला
चांडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराला सोमवारी (दि.३१) शाळा भरण्यापूर्वीच टाळे लावण्यात आल्याने विद्यार्थी व शिक्षकांना वर्गखोल्यांमध्ये प्रवेश करता आला नव्हता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी रस्त्यालगत वर्ग भरविला होता.
या प्रकारामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. शाळेच्या जागेच्या मालकी हक्कावरून हा प्रकार घडल्याची चर्चा होती. याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले.
दरम्यान, संपत महादेव वळसे यांनी गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासमोर शाळेला कुलूप लावल्याचे मान्य केले. तसेच या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून लेखी माफीनामा सादर केला. त्यानंतर मात्र संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई न करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका प्रकरणात शाळेला टाळे लावल्याचे मान्य करून माफीनामा सादर केल्यानंतर कारवाई होत नाही आणि दुसऱ्या प्रकरणात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या पाच मिनिटांच्या प्रतीकात्मक आंदोलनानंतर गुन्हा दाखल होतो, तर कायद्याची अंमलबजावणी समान निकषाने होते का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा:





