Shirur Nagar Parishad: शिरूर नगर परिषदेत सत्तेला हादरा! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच नगरसेवक सत्ताधारी गटातून बाहेर
Shirur Nagar Parishad : भाजपच्या गोटात उत्साह; नव्या सत्तासमीकरणाची शक्यता, सत्तेच्या चाव्या पुन्हा बदलणार?

शिरूर : नगर परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय धुसफुशीला अखेर तोंड फुटले असून, सत्ताधारी ‘शिरूर नगर परिषद गटाला’ मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना पत्र दिल्याने नगर परिषदेतील सत्तेची गणिते पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत.
उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया, माजी नगराध्यक्ष रवींद्र उर्फ शाम मनोहर ढोबळे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली योगेश जामदार आणि सदस्या चारुशिला गणेश कोळपकर यांनी नगराध्यक्षा पाचर्णे यांना पत्र देत सत्ताधारी गटातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. (Shirur Nagar Parishad)
या निर्णयामुळे शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ‘सत्तेसाठी झालेली तडजोड आता तुटण्याच्या मार्गावर’ असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र आले आणि भाजप सत्तेबाहेर (Shirur Nagar Parishad)
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या शिरूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे नगराध्यक्षपदी निवडून आल्या. नगरसेवकांच्या संख्येत भाजपने बाजी मारत ११ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच आणि एका अपक्षाने विजय मिळविला.
नगर परिषदेच्या २४ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी १२ सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही एका पक्षाला बहुमत गाठता आले नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नगरसेवक आणि एका अपक्षाने एकत्र येत १४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘शिरूर नगर परिषद गट’ या नावाने स्वतंत्र गटाची नोंदणी केली आणि सत्ता स्थापन केली. सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आणूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.
सत्तेत वाटा मिळाला; मात्र मनोमिलन झालेच नाही!
सत्तास्थापनेनंतर उपनगराध्यक्षपदासह पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद आणि महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांकडे देण्यात आले.
मात्र, राजकीय तडजोडीतून तयार झालेला हा गट प्रत्यक्षात मनाने एक झाला नसल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसून येत होते. किरकोळ कुरबुरी, हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप आणि विकासकामांवरून सुरू असलेली राजकीय चढाओढ अखेर उघड संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचली.
‘आम्हाला सापत्नभावाची वागणूक’
सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याच्या निर्णयामागे नगर परिषदेच्या कामकाजातील दुजाभाव आणि सापत्नभावाची वागणूक कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष रवींद्र उर्फ शाम ढोबळे यांनी केला आहे.
पक्षाचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षा पाचर्णे यांना दिलेल्या पत्रात, नगर परिषदेच्या सर्वसाधारण तसेच विशेष सभांमध्ये त्यांच्या गटाच्या मतांची व विचारांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभांमधील विषयांवर पुरेशी चर्चा अथवा विचारविनिमय न करता निर्णय घेतले जात असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेष सभेपूर्वी किंवा सभेनंतरही त्यांच्या गटाच्या मतांचा विचार केला जात नसल्याचा आरोप करण्यात आला असून, दैनंदिन कामकाजातही त्यांच्या गटातील नगरसेवकांना डावलण्याची भूमिका घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘पारदर्शकतेचा अभाव; भ्रष्टाचाराला पोषक वातावरण’
सत्तास्थापनेसाठी आमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला असतानाही विकासप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतले जात नसल्याने नगर परिषदेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव निर्माण झाला असून भ्रष्टाचाराला पोषक वातावरण तयार होत असल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.
गटनेते आणि पक्षप्रमुखांना याबाबत वेळोवेळी माहिती देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याने अखेर सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे ढोबळे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या गोटात उत्साह; सत्तेचे नवे समीकरण जुळणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने विद्यमान सत्ताधारी गटाचे बहुमत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात नगर परिषदेत धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ११ नगरसेवक असलेल्या भाजपच्या गोटात या घडामोडीनंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच नगरसेवक एकत्र आल्यास नगर परिषदेतील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
असे समीकरण जुळल्यास उपनगराध्यक्षपदासह विविध विषय समित्यांवरही नव्या गटाचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले तरी सत्तेच्या प्रत्यक्ष चाव्या कोणाच्या हातात राहणार, याकडे आता संपूर्ण शिरूरचे लक्ष लागले आहे.
राजकीय तडजोडीतून जन्मलेली सत्ता आता अंतर्गत मतभेदांमुळे डळमळीत झाली असून, शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
Gajanan Kale : ‘कोल्हापूरच्या हृतिक रोशनची फर्स्ट कॉपी’; मनसेने कृष्णराज महाडिकांना डिवचलं





