Shirur News : एफडीएच्या कारवाईची एवढी धास्ती? तब्बल ३५० किलो खवा शेतात फेकून टोळी फरार; चौकशीची मागणी
Shirur News : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा परिसरात गोण्या आणि पिशव्यांमध्ये भरलेला पांढरा संशयित खवा आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

Shirur News – राज्यभर सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेची धास्ती काही व्यावसायिकांनी घेतल्याचे चित्र शिरूर तालुक्यात दिसून येत आहे. शिरसगाव काटा परिसरात अज्ञात व्यक्तींनी तब्बल 350 किलो संशयित खवा शेताशेजारी फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकर्यांना शेतालगत मोठ्या प्रमाणात पांढर्या रंगाचा खवा तसेच त्यासाठी वापरण्यात आलेल्या गोण्या आणि पिशव्या आढळून आल्या. सुरुवातीला हा नेमका कोणता पदार्थ आहे, याबाबत संभ्रम होता. मात्र जवळून पाहणी केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणातील खवा असल्याचे स्पष्ट झाले.
हा खवा विक्रीसाठी नेला जात असताना अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची माहिती मिळाल्याने संबंधितांनी तो रस्त्याच्या कडेला व शेताशेजारी टाकून पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या सण-उत्सव, लग्नसराई आणि मिठाई उत्पादनासाठी खव्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. याच पार्श्वभूमीवर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचा खवा बाजारात विक्रीस आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येतात.
त्यामुळे शिरसगाव काटा येथे आढळून आलेला हा खवा नेमका कोणाचा आहे, तो मानवी सेवनासाठी योग्य होता का, तसेच त्यामध्ये भेसळ होती का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात खवा एखाद्या सामान्य विक्रेत्याकडे असणे शक्य नसून यामागे संघटित स्वरूपातील पुरवठा साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, राज्यात अन्न भेसळविरोधी कारवाया तीव्र झाल्यानंतर अनेक ठिकाणी संशयित अन्नपदार्थ नष्ट करण्याचे किंवा टाकून देण्याचे प्रकार समोर येत आहेत. शिरसगाव काटा येथील घटना त्याचाच एक भाग असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. जर हा खवा भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचा असल्याचे निष्पन्न झाले, तर तो ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतो.






