Shirur News : एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिरूर : शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत दि. २३ डिसेंबर रोजी ८ :३० वा. च्या सुमारास जुन्या नगर ते पुणे रोडवर नाझ अॅटो अॅक्सेसरिज समोर फिर्यादी आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान व हुसैन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाचा कारणावरून तसेच, समीर शेख यांचे आसिफ खान यांच्या भावाच्या पत्नीचे नाझ किराणा स्टोअर्स येथे केलेल्या गोंधळाचे कारणावरून आरोपी आयान समीर शेख याने हुसेन शहीद शहा याच्या सांगण्यावरून आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान ( वय २२ वर्षे ) यास त्याच्या हातातील कोयत्या सारख्या धारदार हत्याराने जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन त्याचा तपास शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यांचेकडे देण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी हुसैन शहीद शहा यास दि. २४ डिसेंबर रोजी गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली होती. आरोपी आयान समीर शेख हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.
सदर गुन्हयाची गंभीरता लक्षात घेऊन संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकाला गुन्हयामधील आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी आयान समीर शेख हा तासगाव जिल्हा सांगली येथे आहे.
सदर बातमीच्या आधारे तांत्रीक विश्लेशन करून तपास पथकाचे शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ हे तासगाव जिल्हा सांगली येथे आरोपीताचा शोध घेणेकामी गेले असता आरोपी आयान शेख हा तेथुन फरशी बसवण्याचे कामानिमीत्त उंब्रज येथे गेल्याबाबत माहीती मिळाली.
सांगली येथुन पुन्हा शुभम चव्हाण पोलीस उपनिरीक्षक पोलीस, अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ हे उंब्रज येथे जावुन माहीती घेवुन उंब्रज ता .कराड, जि. सातारा येथील एस टी स्टॅन्ड जवळुन सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेवून गुन्हयाचे कामी अटक करण्यात आले आहे. आरोपी आयान समीर शेख यास न्यायालयात हजर केले असता दिनांक २२ जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साो, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो. हवा नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, विनोद काळे, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केली आहे.





