Shirur News : सविंदणे गावाचा शिल्या बैल 11 लाखांना विकला, प्रकाश मेचेंचे कौतुक

शिरूर : शिरूर तालुक्यातील सविंदणे गावाने बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. प्रगतशील शेतकरी आणि बैलगाडा मालक प्रकाश बबन मेचे यांच्या ‘शिल्या’ या बैलाची ११,११,१११ रुपयांना विक्री झाली असून, ही घटना तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
‘शिल्या’ने अनेक नामांकित बैलगाडा शर्यतीत आपल्या ताकदी, वेग आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाने प्रकाश मेचे यांचे नाव उंचावले. हा बैल सलगर ग्रुप बैलगाडा संघटनेचे अजित आणि अक्षय ज्ञानेश्वर काळजे (चर्होली) यांनी १.११ लाख रुपये देऊन खरेदी केला. विक्रीनंतर सविंदणे गावात वाजत-गाजत मिरवणूक काढून बैलाला निरोप देण्यात आला. यावेळी प्रकाश मेचे आणि बैलगाडा शौकीन भावूक झाले होते.
प्रकाश मेचे यांच्या बैल जोपासना, खुराक आणि नियमित प्रशिक्षणाच्या मेहनतीमुळे ही विक्री शक्य झाल्याचे स्थानिकांनी नमूद केले. गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालत मेचे यांनी बैलगाडा शर्यतीत जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या बैलांनी अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत. ही विक्री केवळ आर्थिक व्यवहार नसून, ग्रामीण कृषी संस्कृती आणि बैल संवर्धनाच्या परंपरेची पावती आहे. सविंदणे गाव आणि शिरूर तालुक्यातील बैलगाडा शौकीन आणि ग्रामस्थांनी प्रकाश मेचे यांचे अभिनंदन केले असून, त्यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगितले.





