Shirur News : महसुल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई ! आलेगाव पागा येथून 14 बेठविगार मजुरांची सुटका

शिरूर : शिरूर (Shirur News) तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका शेतगुऱ्हाळात बेकायदेशीरपणे बंदिस्त ठेवलेल्या १४ मजुरांची महसूल आणि पोलीस प्रशासनाने यशस्वी सुटका केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अमानवीय परिस्थितीत अडकलेल्या या मजुरांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि लेबर लाईन सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले.
ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (रा. म्हगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. आलेगाव पागा) यांनी लेबर लाईन पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यांनी म्हटले की, शेतगुऱ्हाळात त्यांच्यासह १३ मजुरांना जबरदस्तीने कामाला लावले गेले असून, मालकाकडून मानसिक, आर्थिक आणि सामाजिक छळ होत आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ आणि लेबर लाईन संस्थेच्या (अजिविका ब्युरो, हडपसर, पुणे) पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सर्व १३ मजुरांची सुखरूप सुटका करून त्यांना शिरूर तहसील कार्यालयात आणण्यात आले. येथे त्यांना सुटका प्रमाणपत्र, जेवण आणि मूळ गावी परतण्याची व्यवस्था प्रशासनाने केली.
या कारवाईदरम्यान (Shirur News) प्रांताधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ आणि लेबर लाईन संस्थेचे शुभम गुरव, पराग कांबळे, अर्चना यादव उपस्थित होते. तक्रारदार चव्हाण यांनी शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या धडक कारवाईमुळे गुलामगिरीत अडकलेल्या मजुरांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी डुडी आणि प्रशासकीय पथकाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





