Shirur News : सविंदणे गावात निवृत्त जवानांचा ढोल-ताशांच्या गजरात जंगी सन्मान

शिरूर : देशसेवेत उल्लेखनीय योगदान देऊन मायभूमीत परतलेल्या सविंदणे (ता. शिरूर) येथील चार निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात थाटात संपन्न झाला.सुभेदार मेजर संतोष नाथू पोकळे, मेजर दत्तात्रेय मारूती पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ आणि दीपक साहेबराव लंघे यांच्या सन्मानार्थ गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे उत्साहात स्वागत केले. श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित समारंभात मान्यवरांनी शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन जवानांचा सत्कार केला. याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून महसूल सहाय्यक म्हणून निवड झालेल्या शुभम दत्तात्रेय लंघे, अजित सदाशिव पडवळ आणि ग्राम महसूल अधिकारीपदी नियुक्त झालेल्या शंकर बाजीराव नरवडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम श्री भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटना, माँ जिजाऊ सैनिक महिला संघटना आणि सविंदणे ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणा घोडे, बाळासाहेब डांगे, सरपंच मनिषा नरवडे, उपसरपंच रविंद्र पडवळ, आजी-माजी सैनिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन माँ जिजाऊ सैनिक महिला संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा पडवळ यांनी केले, तर आभार श्री भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष देवराम मिंडे यांनी मानले.





