Shirur News : स्वतःहून अतिक्रमण काढा, नाहीतर..पुणे-नगर रोडवर PMRDA ची मोठी मोहीम, या तारखेनंतर होणार धडक कारवाई

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने कडक पाऊल उचलले आहे. या मार्गावरील अतिक्रमणे लवकरच हटणार असून, नागरिकांनी २४ ऑक्टोबरपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे.पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत झालेल्या आंदोलनानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे.
अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीत शिरूर, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, रांजणगाव गणपती परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर चर्चा झाली.जड वाहन वाहतूक, बॉटलनेक आणि अतिक्रमणे या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी २४ ऑक्टोबरनंतर अतिक्रमणमुक्त नगर रोड मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेमुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होणार असून, नागरिकांचा दैनंदिन प्रवासातील त्रास कमी होईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने नागरिक, व्यापारी आणि स्थानिक प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





