शिरूर : शिरूर येथील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पायलटिंगने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ द्वारे शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली. शस्त्र विसर्जन सोहळ्याद्वारे शौर्य आणि त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक सुभेदार देवराम मिंडे,कॅप्टन विश्वनाथ कोंडीबा ढवळे,नाईक सुभेदार बापूराव ढवळे, व महासैनिक कॅडेट फाउंडेशनचे संचालक सुभेदार शांताराम मोरे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे चेअरमन अनिल सर व प्राचार्या नॅन्सी पायस मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नृत्य, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः कारगिल युद्धावरील नाटिकेने उपस्थितांमध्ये कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे भाव निर्माण केले. कार्यक्रमादरम्यान शहीद जवानांच्या बलिदानाला वंदन करत विद्यार्थ्यांनी ‘जय जवान’चा नारा दिला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये भारतीय लष्कराच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत शौर्य आणि देशसेवेचे मोल स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्या नॅन्सी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांच्या मनात देश प्रेम निर्माण करणे हीच सेंट जोसेफ शाळेची खरी जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” गीताने झाली. देशभक्तीचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.