Shirur News : जांबूत विकास सोसायटीची सभासदांना दिवाळी भेट; 15 टक्के लाभांश जाहीर

जांबूत : येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करून सभासदांची दिवाळी गोड केली आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजूरी घेत दिपावली निमित्त संस्थेच्या भागधारकांना मार्च २०२५ या वर्षाअखेरील भाग रकमेवर १५ टक्के या प्रमाणे लाभांश सभासदांच्या खात्यात लवकरच वर्ग करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आनंदराव जगताप यांनी सांगितले.
मार्च २०२५ अखेर या संस्थेचे १२१८ एवढे सभासद असून भागभांडवल ८२ लाख ७८ हजार ३६९ एवढे आहे. संस्थेच्या सभासदांनी या वर्षात सुमारे ९ कोटी ३ लाख ७० हजार रुपये एवढ्या कर्जाची रक्कम भरून बँक पातळीवर वसुलीस चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला असल्याने संस्थेस मार्च २०२५ अखेर ४० लाख ५८ हजार ३१२ रुपये एवढा ढोबळ नफा झालेला आहे. संस्थेचा पारदर्शक कारभार पाहता सन २०२४/२०२५ या आर्थिक वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त करून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून चांदीची ढाल देऊन गौरविण्यात आले आहे.
या संस्थेकडून शेतकर्यां ना पीककर्जा सोबत, ट्रॅक्टरकर्ज, शेडनेट कर्ज, गाय म्हैसपालन आदी शेतीपुरक व्यवसायांना कर्ज दिलेले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विकास डफळ यांनी सांगितले असून जांबूत विकास सोसायटीने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कृषी सेवा केंद्र उभारले असून यामधून संस्थेस सुमारे ४० लाख ५८ हजारांहून अधिकचा नफा मिळाल्याचे संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पठारे यांनी सांगितले.
जांबूत विकास सोसायटीकडून नेहमीच सामाजिक व अध्यात्मिक बांधिलकी जपली जात असून गावातील खंडेराय देवस्थान उभारणीकरिता १ लक्ष रुपयांचा मदत निधी देण्यात आलेला आहे. या सभेप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, अरुणा घोडे, वसुदेव जोरी, जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, डॉ.शिवाजी जगताप, बाळकृष्ण कड, हरिभाऊ सरोदे यांचेसह संस्थेचे संचालक भाऊसाहेब जोरी, अरूण कदम, पोपट गांजे, रोहिदास इसवे, भागीनाथ कोरडे, खिवाराज फिरोदिया, उत्तम जगताप, रविंद्र म्हस्के मीराबाई कड, हिराबाई गाजरे , बाजीराव चौधरी , युवराज पळसकर यांचेसह सचिव हेमंत वायदंडे, रोहिणी कणसे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





