Shirur News : शिरूरमध्ये “भटके विमुक्त दिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी न्हावरा येथे शिबिराचे आयोजन

शिरूर : पुणे जिल्हाधिकारी आणि शासनाच्या निर्देशानुसार शिरूर तालुक्यात ‘भटके विमुक्त दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने मौजे न्हावरा (ता. शिरूर) येथील साईनाथ मंगल कार्यालय, आंधळगाव फाटा येथे रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात भटक्या आणि विमुक्त समाजाच्या संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपरांचा जागर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि माहितीपर सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजातील विद्यार्थी आणि युवकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, आधार कार्ड नोंदणी, जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाईल.
याशिवाय, शासकीय विभागांमार्फत भटक्या आणि विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात येणार आहे.
तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आवाहन केले आहे की, “शिरूर तालुक्यातील भटक्या आणि विमुक्त जाती-जमातीतील सर्व नागरिकांनी या शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा उपयोग करून आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा.” या शिबिरामुळे भटक्या आणि विमुक्त समाजाला सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.





