Shirur News: शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; विहिरींना ९५ लाख मंजूर, पाणी समस्या होणार दूर

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत शिरूर तालुक्यातील विहिरींसाठी ९५ लाख रुपयांची मोठी मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या पुढाकाराने हा निर्णय वेगाने झाला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.विहिरींच्या मंजुरीमुळे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता सुधारून शेतीला स्थिर आधार मिळणार असून उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील परिसरात शेती विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे व त्यांची विकासकामे पूर्ण करणे ही माझी प्राधान्याची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या दूरदृष्टीमुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली आहे. भविष्यातही मी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहील,” असे त्यांनी सांगितले.
शेतकरीहिताचा निर्णय
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवणार आहे. यातून शेतीला दिशा मिळणार आहे. शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी आश्वासक पाऊल टाकले आहे.
विहिरींच्या मंजुरीमुळे शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत पुरवठा उपलब्ध होणार असून त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक स्तरातही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठीचा हा निर्णय तालुक्यात स्वागतार्ह ठरत आहे.





