Shirur News : डॉ. प्रकाश उचाळे यांच्या सेवेचा कवठे येमाईत भव्य सत्कार

शिरूर : “डॉ. प्रकाश उचाळे यांनी पशुधन आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवला असून, दूधउत्पादन वाढीसाठी त्यांचे योगदान अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले. कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश उचाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपटराव गावडे होते. जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार, माजी सभापती सुनिता गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सेवानिवृत्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे, नाशिकचे उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, सहाय्यक आयुक्त एन. एम. पवार, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट यांच्यासह अनेक मान्यवर, शेतकरी आणि दूधउत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन लहु साबळे यांनी केले, तर स्वप्नील उचाळे यांनी आभार मानले.
डॉ. उचाळे यांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ सेवेचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे शेती आणि दुग्धव्यवसायाला नवी दिशा मिळाली असून, हे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे सर्वांनी नमूद केले.
उपस्थितांची गर्दी ठरली कार्याचा सन्मान
सत्कार समारंभाला शेतकरी आणि दूधउत्पादकांची मोठी गर्दी झाली होती. या उत्स्फूर्त उपस्थितीतून डॉ. उचाळे यांच्या कार्याची समाजातील खरी पोचपावती दिसून आली. पांडुरंग पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.





