Shirur Navratri : विधवा महिलांच्या हस्ते देवीची आरती ; शिरूर कुंभार आळी नवरात्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – येथील कुंभार आळी नवरात्र उत्सव मंडळाने यंदाही विधवा महिलांच्या हस्ते देवीची मानाची आरती करून एक आदर्श पायंडा पाडला आहे. समाजातील दुर्दैवी घटनांमुळे वैधव्य आलेल्या महिलांचा सन्मान करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. मंडळाने २०१८ पासून ही परंपरा सुरू केली आहे.कुंभार आळी नवरात्र उत्सव मंडळाचे हे चौथे वर्ष असून, स्थापनेपासूनच हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. पारंपरिकरित्या विधवा महिलांना देवकार्यापासून दूर ठेवले जाते.
मात्र, या प्रथेला छेद देत मंडळाने त्यांना देवीच्या आरतीमध्ये सन्मानपूर्वक सहभागी करून घेतले आहे. यामुळे समाजात सकारात्मक विचार रुजवण्याचे काम होत असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.आरती करताना विधवा महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ‘आज आम्हालाही देवीच्या आरतीत मानाचे स्थान मिळाले, यापेक्षा मोठा आनंद नाही,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे, २०१८ साली शिरूर कुंभार समाजाने विधवा महिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या अनिष्ट प्रथांना बंदी घालण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला होता.
महाराष्ट्रात असा ठराव करणारा हा पहिलाच समाज ठरला होता. तेव्हापासून कोणत्याही देवकार्यात विधवा महिलांना समानाची वागणूक दिली जाते. तसेच, स्मशानभूमीत मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या, कुंकू उतरवण्याची जुनी प्रथाही त्याच वर्षापासून थांबवण्यात आल्याचे समाजाध्यक्ष योगेश जामदार यांनी सांगितले.यावेळी परिसरातील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांचा सहभाग आणि महिलांच्या डोळ्यात दाटलेले समाधानाचे अश्रू या उपक्रमाचे यश दाखवून देत होते. शिरूर कुंभार आळी नवरात्र मंडळाचा हा उपक्रम समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करून समतेचा संदेश देणारा ठरत आहे.





