…तर गडकरी पंतप्रधान झाले असते, खासदार अमोल कोल्हेंचे मोठे विधान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिक्रापूर या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केले आहे. एनडीएच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी झाले, पण भाजपने संसदीय मंडळाची बैठक घेतली असती तर नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते असे विधान त्यांनी केले आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
भाजपने संसदीय मंडळाची बैठक न घेता थेट महायुतीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून घोषित केले. जर ती बैठक झाली असती तर नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. ज्या नेत्याचं आम्ही नेहमी कौतुक करतो कदाचित त्यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून बघायला मिळालं असतं. ते भाग्य लाभलं असतं.
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होतोय हे सांगताना आम्हालाही अभिमान वाटला असता. गडकरी साहेबांनी कोणताही पक्षभेद न पाळता पक्षापलिकडे काम केलं. पुणे – नगर महामार्गाचा विषय मार्गी लावला असंही अमोल कोल्हे म्हणाले.





