Shirur Crime : शिरूरमध्ये 57 ग्रॅम ‘एमडी’सह दोघे ताब्यात; 12.20 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Shirur Crime : शिरूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 57 ग्रॅम मेफेड्रॉनसह दोघांना ताब्यात घेत 12.20 लाखांचा मुद्देमाल जप्त. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू.

Shirur Crime : न्हावरा-तळेगाव ढमढेरे मार्गावरील शेळके वस्ती परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन तरुणांना 57 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एमडी, दोन मोबाईल फोन आणि विनानंबरची मोटारसायकल असा एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रदीप विठ्ठल कोरेकर (वय 24, रा. न्हावरा) आणि साईनाथ जनार्धन भोसीकर (वय 23, रा. करडे रोड, कारेगाव, ता. शिरूर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी एमडीचा माल ज्ञानेश उर्फ माऊली काळुराम कोरेकर (रा. न्हावरा) याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेळके वस्ती येथील दत्ता नलगे यांच्या शेताजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रदीप कोरेकर याच्याकडून 32 ग्रॅम एमडी (किंमत 6 लाख 40 हजार रुपये), तर साईनाथ भोसीकर याच्याकडून 25 ग्रॅम एमडी (किंमत 5 लाख रुपये) जप्त केले.
याशिवाय प्रदीप कोरेकरकडील सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई मोबाईल, साईनाथ भोसीकरकडील आयफोन 13 प्रो आणि विनानंबरची होंडा शाइन मोटारसायकल असा 80 हजार रुपयांचा इतर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क), 21(क), 22(क), 29 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला अंमली पदार्थ नेमका कोणाकडून आणला आणि त्याची पुढे कोणाला विक्री केली जाणार होती, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जनार्धन सुरेश शेळके यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.





