Shirur : आमदाबाद येथे बिबट्याचा दोन तरुणांवर हल्ला; जीवाची बाजी लावत केला प्रतिकार

आमदाबाद येथे बिबट्याचा दोन तरुणांवर हल्ला
जीवाची बाजी लावत प्रतिकार
परिसरात दहशतीचे वातावरण
सविंदणे(प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे शेतात काम करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणांनी बिबट्यांशी दोन हात करून स्वतःचा जीव वाचवला आहे.
जखमी तरुणांना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा झालेल्या ह्या हल्ल्यामुळे आमदाबाद, माशेरेमळा व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या भागात पिंजरा लावून हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
विकास रतन जाधव, वैभव मोहन जाधव असे यात धाडसी तरुणांची नाव असून त्यांच्या पाठीला, हाताला, कानाला बिबट्याने हल्ला केल्यामुळे जखमा झाल्या आहेत. शिरूर तालुक्यातील अहमदाबाद येथील शेतामध्ये हे तरुण काम करत असताना अचानक मक्याचे शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने विकास जाधव याच्यावर हल्ला केला.
यावेळी वैभव जाधवने त्याच्या हातात असणाऱ्या काठीने बिबट्याला मारले. त्यामुळे बिबट्याने विकासला सोडून वैभव जाधव यांच्या पाठीवर हल्ला करून पंजात पकडले, चावा घेण्याचा प्रयत्न केला.
याच वेळेस जखमी झालेल्या विकासने वैभवला वाचविण्यासाठी बिबट्यावर हल्ला चढवला. यात बिबट्या गांगरून गेला आणि पळ काढला. दोन्ही तरुणांच्या धाडसीपणा व एकमेकांना वाचवण्याची इच्छाशक्ती यामुळे तरुणांचे प्राण वाचले.





