Shirur : शिरूरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत भरदिवसा घरफोडी; 2 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने चोरीला
Shirur : शिरूरच्या मुंबई बाजारपेठेत वकिलाच्या बंद घराची खिडकी फोडून दोन तोळे सोने आणि २.१० लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

Shirur : शिरूर शहरातील मुंबई बाजारपेठेत भरदिवसा घरफोडीची घटना घडली. प्रसिद्ध वकील ॲड. शिरीष लोळगे यांच्या बंद घराची खिडकी फोडून चोरट्यांनी सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने आणि २ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
लोळगे कुटुंबीय विवाह समारंभासाठी पुण्याला गेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शेजारच्या मोकळ्या जागेतून भिंत ओलांडून स्वयंपाकघराची खिडकी फोडण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा शोध सुरू आहे. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.





