प्रभात वृत्तसेवा शिरूर ( अरुणकुमार मोटे ) – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत फॉर्म भरण्याच्या सुरुवातीपासून अनपेक्षित घडामोडींची मालिका सुरू झाली आहे. प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल यांची शहर विकास आघाडी निवडणुक लढवण्यापासून माघार घेतली आहे. त्यामुळे विविध पक्षांतील हालचाली, उमेदवार निवडीतील ताणतणाव आणि बदलती समीकरणे यामुळे या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ घडण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. गेल्या पंचवार्षिकात शहराची वाढ, नवे मतदार, बदललेली भौगोलिक स्थिती आणि वाढता शहरी विस्तार यामुळे राजकीय गणितच बदलले असून, पारंपरिक नेत्यांसमोर नव्या आव्हानांची उभारी आहे. नगरपरिषदेच्या प्रभागांमध्ये विविध पक्षांच्या वतीने चाचपणी करून उमेदवार निवड अंतिम टप्प्यात आली असली तरी अनेक प्रभागांत पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांचे स्थान बदलण्याची मागणी होत असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच काही गट पळ काढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिरूरच्या राजकारणात काही गट व नेते सतत प्रभावी राहिले असले तरी वाढत्या स्थलांतरामुळे मतदारसंख्या बदलल्याने समीकरणे ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला सरळ विजयाचा मार्ग नसून गटबाजी, आघाड्या आणि स्वबळावरची लढत यामुळे निकाल चुरशीचा होणार आहे, असे जाणकारांचे मत आहे. शिरूर शहरातील आगामी निवडणूक मतदारांच्या भावनांची परीक्षा ठरणार आहे. पुढील काही दिवसांत या निवडणुकीचा खरा रंग दिसणार आहे. विशेषत नव्या वसाहतीतील शहरी मतदार, तरुण मतदारांचा वाढता प्रभाव, विकासकामे रखडल्याने काही प्रभागामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे निवडणुकीत अपेक्षित धक्के बसू शकतात. निवडणुकीपूर्वी दोन प्रमुख पक्षांमध्ये संभाव्य आघाडीची चर्चा सुरू असून काही माजी नगरसेवकांनी स्वतंत्र मार्गाचा विचार सुरू केला आहे. तिसरा एक प्रमुख पक्ष स्वतंत्र उमेदवारांना एकत्र आणून निर्णायक भूमिका मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. शहरातील काही प्रभावी गटांनी पक्षांतराचे संकेत दिल्याने निवडणुकीचा रंग अधिकच तापला आहे. शहरात गेल्या दोन वर्षांत पाणीपुरवठ्यात अपुरा दबाव, सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी, कचरा गोळा करण्यातील अनियमितता, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी या समस्या गंभीर झाल्या असून मतदार यावेळी ‘कामगिरी विरुद्ध आश्वासने’ हा निकष ठेवून मतदान करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिरूरच्या राजकारणातील परंपरा पाहता, निवडणुकीच्या आधीच्या दोन ते तीन दिवसांतच सर्वात मोठ्या घडामोडी घडतात. यंदाही काही नेत्यांच्या निर्णयांमुळे समीकरणांमध्ये नाट्यमय बदल संभवत आहेत.