प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १८) झालेल्या छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले आहेत, तर नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे आता अर्ज माघारीच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. आमदार माऊली कटके यांच्या गोटात ‘पाचर्णे’ कुटुंबाने भाजपकडून स्वतंत्र पॅनल उभे करत राजकीय धक्का दिला आहे. तसेच, आमदार कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐश्वर्या अभिजीत पाचरणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने निवडनूक चुरशीची होणार आहे.अर्ज वैधतेनंतर आता सर्वांची नजर माघारीवर असून, कोण माघार घेणार, कोणत्या प्रभागात कोणाचे समीकरण बदलणार आणि महायुतीतील अस्वस्थता कुठे बाहेर पडणार, यावरच आगामी निवडणुकीचे संपूर्ण चित्र अवलंबून राहणार आहे. छाननीमुळे शिरूरमधील राजकीय तापमान आणखी वाढले आहे. छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद -प्रभाग ११ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे तुषार वेताळ यांचा पक्षीय अर्ज सूचक नसल्याने अवैध ठरला आहे. परंतु, त्यांची अपक्ष उमेदवारी वैध ठरल्याने ते राष्ट्रवादी -पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असतील. -प्रभाग २ – पूजा अमित शिर्के यांचा राष्ट्रवादी (शरद पवार) चा डमी अर्ज अवैध. -प्रभाग १२ – महेंद्र पाचर्णे यांचा पक्षीय डमी अर्ज अवैध. -प्रभाग ५ – लता ससाणे यांचा भाजपचा अर्ज जोडपत्र नसल्यामुळे अवैध. -प्रभाग ११ – शिवसेनेच्या सुप्रिया साकोरे यांच्या अर्जात जोडपत्र नसल्याने अर्ज अवैध ठरला आहे. परंतु, प्रभाग ७ मधून शिवसेनेकडून दाखल केलेला त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. महायुतीत तिन्ही पक्ष स्वतंत्र रिंगणात.. शिरूर नगरपरिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने महायुतीमध्ये उघड फूट पडलेली दिसत आहे. यामुळे तिन्ही पक्षांमधील अंतर्गत नाराजी आणि वर्चस्वाची लढत आता उघडपणे समोर आली आहे.