प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूरच्या बेट भागातील जांबूत (शरदवाडी) परिसरात शनिवार (दि.१८) रात्री साडेअकराच्या सुमारास सिंधुबाई शांताराम गुजर या महिलेच्या घरी घरफोडी करून त्यांना जबर मारहाण करीत त्यांच्या अंगावरील अडीच तोळे सोने ओरबडून चोरट्यांनी पोबारा केला. यावेळी सिंधुबाई गुजर यांना जबर मारहाण केली. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले होते.जांबुत (शरदवाडी) परिसरात जोरीलवण वस्तीवर सिंधुबाई गुजर या घरात एकट्याच राहत असून रात्रीच्या वेळी त्या जेवण करून झोपलेल्या असताना तीन चोरट्यांनी त्यांच्या दारावर दगड टाकून टिकावाच्या साह्याने घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. सिंधुबाई गुजर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कानातील दागिने ओरबडून अंगावरील दागिने हिसकावून घेत चोरटे दुचाकीवरून पंचतळे, पिंपरखेडच्या बाजूला पळून गेल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले. यावेळी जोरीलवण वस्तीवरील चोरट्यांचा पाठलाग केला असता पंचतळे परिसरात दुचाकी सोडून अंधारात चोरट्यांनी पळ काढला.पंधरा दिवसापासून या भागात भागात बिबट्याने हौदोस माजवला असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशातच बिबट्यांची भीती नागरिकांच्या मनामध्ये असून त्यात अशा प्रकारच्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे जांबूत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एका बाजूला बिबट्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे या परिसरातील महिलांसह ग्रामस्थ देखील भयभीत झाले असून तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पैलवान प्रशांत जोरी यांनी केली. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी हाजी दूरक्षेत्राच्या रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.