Shirur Crime: शिरूर पोलिसांची धडक कारवाई! ‘कोयत्या’ गँगचा सराईत गुन्हेगार जेरबंद; ३ गावठी पिस्तुले, ४ काडतुसे जप्त
Shirur Crime: मुख्य आरोपी विजय ऊर्फ कोयत्या शेंडगे याच्या चौकशीतून दुसरा आरोपी जाळ्यात; निमोणे परिसरातुन दोन पिस्तुले व काडतुसे हस्तगत.

Shirur Crime – शिरुर पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेताच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे तपास पथकाने दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे असा १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे शिरुर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे.
(दि.१४) रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे पथक हद्दीत गस्त घालताना अंमलदार नितेश थोरात यांना विजय ऊर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (रा. आमदाबाद, ता. शिरुर) हा न्हावरे हद्दीत पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आदींनी न्हावरे मंडल अधिकारी कार्यालयासमोर परिसरात सापळा रचला.
पथकाने संशयित शेंडगे यास ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्या कमरेला एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना शिरुर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केली.
चौकशीतून दुसरा आरोपी जाळ्यात
पोलिसांनी शेंडगे याची कसून चौकशी केली. त्याने बापू कोंडीबा पारखे (रा. सरकेवस्ती, निमोणे) याच्याकडे दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी पारखे याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. एकूण तीन गावठी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. मुख्य आरोपी शेंडगे हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, विनयभंग, मारहाण आदी गंभीर गुन्हे शिरुर व शिक्रापूर पोलिसांत दाखल आहेत.





