Shirur Crime : भरचौकात शिक्षकावर जीवघेणा हल्ला! १५-२० जणांच्या टोळक्याने घरातून ओढले..पाहा काय घडलं?
Shirur Crime : सविंदणे येथील घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात अस्वस्थता; दोषींना तातडीने अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी.

Shirur Crime – सविंदणे (ता. शिरूर) येथे क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी बुधवारी (दि. २५) शाळेसमोर ठिय्या आंदोलन केल्याने गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. या प्रकारामुळे शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. २४) सायंकाळी शिक्षक नितीन चव्हाण हे घरी असताना १५ ते २० जणांच्या टोळक्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. या टोळक्याने त्यांना ओढत घराबाहेर काढले आणि भरचौकात नेऊन लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या-दांडक्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांच्या हातात कोयते असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
घटनेनंतर जखमी शिक्षकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून बुधवारी सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी शाळेसमोर ठिय्या मांडला. आमच्या शिक्षकांना न्याय द्या, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी फलक हातात धरून निषेध नोंदवला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
पोलिसांचे आश्वासन
सुमारे चार तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, तातडीने कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.
शैक्षणिक वर्तुळात अस्वस्थता
सविंदणे येथील या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि शिक्षकांवर अशा प्रकारे हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.





