शिरूर – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परिसरात बुधवारी (दि. २०) सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला असून, त्यांच्या मृत्यूमागे खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिसांनी तातडीने हाती घेतला असून, खून झाला असल्यास त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेके मंगळवारी (दि. १९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले होते. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजेपर्यंत त्यांचा मोबाइल सुरू होता; परंतु त्यानंतर तो बंद झाला. संपूर्ण दिवसभर ते घरी परतले नाहीत किंवा त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. यामुळे चिंतेत असलेल्या मुलांनी आणि नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, फाकटे येथील एका तरुणाने मंगळवारी टेके यांना गणेशनगर-गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी नातेवाइकांनी या मार्गावर शोध घेतला असता, कवठे येमाई येथील गांजेवाडी रोडवरील एका पोल्ट्री शेजारी टेके यांची दुचाकी आढळली. तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि मानेजवळ गंभीर जखमा आढळून आल्या असून, प्राथमिक तपासात खुनाचा संशय बळावला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासाला गती देण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयताच्या मृत्यूमागील कारणांबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.