Shirur Bazar Samiti : शिरूर बाजार समितीत विक्रमी अर्ज! १८ जागांसाठी तब्बल ३०० उमेदवारांची उडी
Shirur Bazar Samiti : उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतरच खरं चित्र स्पष्ट होणार; शिरूरमध्ये राजकीय प्रतिष्ठेची लढाई रंगणार.

Shirur Bazar Samiti – डिसेंबर 2022 पासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी तब्बल 300 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अंतिम दिवशी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवार, समर्थक आणि राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
सहकार क्षेत्रातील सुधारित कायद्यामुळे दहा गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन असलेल्या व्यक्तींनाही निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी सांगितले. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील 11 जागांसाठी सर्वाधिक 131 अर्ज दाखल झाले आहेत.
महिलांसाठी राखीव 7 जागांसाठी 24, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 35, तर विमुक्त जाती-भटक्या जमातीच्या एका जागेसाठी 18 अर्ज प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांसाठी 35 अर्ज, अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी 11 अर्ज, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी 17 अर्ज दाखल झाले आहेत.
हमाल-मापाडी मतदारसंघातील एका जागेसाठी 7, तर व्यापारी-आडते प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी व माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी विक्रमी अर्जांमुळे यंदाची बाजार समिती निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरणार असल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.




