Pune: कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीत दिरंगाई

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराबाबतच्या चौकशीत दिरंगाई होत आहे. बाजार समितीशी संबंधित नसलेल्या सहनिबंधक दर्जाच्या त्रयस्त अधिकाऱ्यांबाबत चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री जयकुमार रावल आणि प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे देण्यात आले आहे. पणनमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात कृषी उत्पन्न बाजार समितीची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती.
प्रत्यक्षात मात्र समिती स्थापन झालीच नाही. दरम्यान, पणन संचालकांनी ७ जुलै २०२५ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, ते बाजार समितीच्या गैरव्यवहार व गैरकारभारास पाठबळ देत असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. त्यामुळे त्रयस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणीही लवांडे यांनी केली
डॉ. धोंडकर यांची चौकशी करा
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराबाबत दोन वर्षांपासून अनेक तक्रारी येत आहेत. त्यामध्ये अनेक बेकायदेशीर कामे झाली आहेत आणि करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. ही सर्व कामे संस्थेचे सचिव म्हणून काम
पाहणारे डॉ. राजाराम धोंडकर अडवू शकत होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केली आहे.





