शिरूर: मद्यपानास पैसे न दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरूर – तालुक्यातील आण्णापुर येथे रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून तीन जणांनी दमदाटी करत मद्यपानासाठी पैसे मागितले आणि नकार दिल्याने त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रदीप शाहू गायकवाड (वय २८, रिक्षाचालक, रा. आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ मे रोजी रात्री १०:३० वाजता ते आपल्या रिक्षातून रामलिंग ते आण्णापुर रस्त्याने घरी जात असताना, बालाजी शाळेजवळ जीवन चंद्रकांत सकट, देवा संजय पठारे आणि रोहीत दीपक भोंडे (सर्व रा. आण्णापुर) यांनी अॅक्टिव्हा मोटारसायकल आडवी लावून त्यांना अडवले. आरोपींनी गायकवाड यांच्याकडे मद्यपानासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करत वायर आणि दगडाने डोक्यात व पायावर मारहाण केली. या हल्ल्यात गायकवाड जखमी झाले, तर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिरूर शहर आणि ग्रामीण भागात अल्पवयीन आणि इतर तरुणांमध्ये ‘भाईगिरी’ची वाढती क्रेझ आणि कायद्याच्या भयाचा अभाव यामुळे चिंता व्यक्त होत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.





