Cannabis : धुळे जिल्ह्यात गांजाच्या शेतीचा पर्दाफाश! 90 गुंठ्यांवर लागवड, तब्बल 7.68 कोटींचा गांजा जप्त
Cannabis : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिस-वनविभागाची मोठी कारवाई. ९० गुंठ्यांवर गांजाची बेकायदा लागवड उघड; ३ हजार ७२ किलो गांजाची झाडे जप्त.

Cannabis : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदा शेतीचा पोलिस आणि वनविभागाने पर्दाफाश केला आहे. भोरखेडा, रोहिणी आणि खंबाळे परिसरात तब्बल ९० गुंठे क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आली होती.
या कारवाईत पोलिसांनी ३ हजार ७२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांची अंदाजे किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गांजाच्या बेकायदा लागवडीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शिरपूर पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित परिसरात छापा टाकला. अतिदुर्गम भागात करण्यात आलेली गांजाची मोठ्या प्रमाणातील लागवड या कारवाईत उघडकीस आली.
पोलिसांनी गांजाची झाडे उपटून नष्ट केली. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक (NDPS) कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बेकायदा गांजा शेतीमागे नेमका कोणाचा सहभाग आहे, तसेच या लागवडीचे सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.





