Shirang Barne | खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; शपथपत्रात शैक्षणिक माहितीमध्ये विरोधाभास असल्याचा आरोप,कोर्टात होणार चौकशी

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर शपथपत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून खटला चालवण्याचे आदेश वडगाव मावळ विशेष न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सोमवारी (दि. २२) पुढील सुनावणी होणार आहे.तक्रारदार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत बारणे यांनी २००९ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान दिलेल्या शपथपत्रात परस्परविरोधी माहिती दिल्याचा आरोप केला होता.
२००९ च्या शपथपत्रात त्यांनी दहावी उत्तीर्ण (१९८९) असे नमूद केले होते. पण २०१९ च्या शपथपत्रात मात्र दहावी नापास असे लिहिले होते.तक्रारीत बारणे यांनी स्वतःवर असलेल्या प्रलंबित प्रकरणांची माहितीही लपवल्याचा आरोप आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समावेश आहे. तक्रारदार अनिल भांगरे यांनी सांगितले की, आम्ही २०२१ पासून या प्रकरणात तक्रार करून पाठपुरावा करत होतो. अखेर न्यायालयाने खटला सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
पोलिस चौकशी व न्यायालयाचा आदेश..
या तक्रारीवर न्यायालयाने वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानंतर डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद मांडला. न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १२५-अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले.
“मला अजून याबाबत काही माहिती नाही. मी प्रथम या संदर्भात माहिती घेईन.”
– श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ





