‘मोदी-शहा यांच्या पाठिंब्यामुळेच…’ CMपदाचा दावा सोडताना शिंदेंचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde on CM post – विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपच्या जागा जास्त असल्याने, त्यांच्याच वाट्याला मुख्यमंत्रीपद जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र शिवसेना नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. अशातच आज राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपाच्या मुख्यमंत्र्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांनी ही घोषणा करत ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी, ‘दिल्लीमध्ये उद्या (गुरवार) अमित शहा यांच्या उपस्थितीत एनडीएतील प्रमुख तीन पक्षांची बैठक होणार आहे, ज्यात मुख्यमंत्रीपदावर अंतिम निर्णय होईल’ अशीही माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली.
कोणताही अडथळा आणला जाणार नाही | Eknath Shinde on CM post
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, एनडीए जो निर्णय घेईल, तो निर्णय त्यांना मान्य असेल. त्यांनी हेही सांगितलं की, सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत त्यांच्याकडून कोणताही अडथळा आणला जाणार नाही. यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. स्वतः शिंदे यांनीही भाजपाचा मुख्यमंत्री मान्य असल्याचं जाहीर केलं आहे.
गरीब आणि गरजू लोकांसाठी भरीव काम | Eknath Shinde on CM post
शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळातील योजना आणि कामांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तेव्हा निर्धार केला होता की, गरीब आणि गरजू लोकांसाठी काहीतरी भरीव काम करायचं. गरीब कुटुंबांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी विशेष योजना आखल्या. राज्याच्या प्रगतीचा वेग वाढवण्याचं काम आम्ही केलं. पंतप्रधान मोदींचा मला मोठा पाठिंबा मिळाला, त्यांनी नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहून मार्गदर्शन केलं. इतक्या मोठ्या निर्णयांवर याआधी कोणत्याही सरकारने काम केलं नव्हतं.”
मोदी आणि शहा यांच्या पाठिंब्यामुळेच एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी | Eknath Shinde on CM post
शिंदे यांनी मोदी-शहा जोडीबद्दल विशेष उल्लेख करत सांगितलं की, “मोदी आणि शहा यांच्या पाठिंब्यामुळेच एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, आणि हे माझ्यासाठी अभिमानाचं आहे.”





