बुलढाणा : बुलढाणा शहरात सध्या संजय गायकवाड यांची कार फार चर्चेत आहे. तब्बल दोन कोटींची ही कार म्हणजे अगदी राजेशाही थाट म्हणावा लागेल. आता एखादा आमदार दोन कोटीची कार घेतो आणि वाद होणार नाही हे अशक्यच म्हणावे लागेल. पण हा वाद विरोधकांनी नाही तर महायुतीतल्याच सहकाऱ्यांनी उकरून काढला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी ही डिफेंडर कार कंत्राटदाराकडून कमिशनच्या रुपात घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याच आमदारावर हा आरोप महायुतीच्याच घटक पक्षातील नेत्याने केला आहे. दरम्यान विजय शिंदेंच्या आरोपांवर संजय गायकवाडांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ही कार आपली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही कार आपल्या नातेवाईकाची आहे. त्यामुळे आपल्यावर केला जाणारा आरोप हा चुकीचा आणि राजकीय आकसापोटी केला असल्याचे प्रत्युत्तर गायकवाड यांनी दिले.