Tatkare Family : तटकरे कुटुंब भाजपमध्ये जाणार होतं; ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा
रायगडच्या राजकीय वर्तुळातून (Tatkare Family) एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Tatkare Family : रायगडच्या राजकीय वर्तुळातून (Tatkare Family) एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबावर थेट निशाणा साधत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
तटकरे कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते, असा थेट दावा दळवी यांनी केला आहे. जर अजित पवार पूर्ण ताकदीने सक्रिय असते, तर सुनील तटकरेंना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केवळ पक्षांतराच्या मुद्द्यावर न थांबता आमदार महेंद्र दळवी यांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत जहरी शब्दांत प्रहार केला. विधान परिषद निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी अनिकेत तटकरे यांना थेट ‘सरोगसी बाळ’ अशी वादग्रस्त उपमा दिली. हे सरोगसी बाळ आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांमुळेच जन्माला आले, असा टोला त्यांनी (Tatkare Family) लगावला.
अनिकेत तटकरेंनी सरोगसीचा अर्थ आधी आपल्या वडिलांना विचारावा, म्हणजे त्यांनी अशी किती मुले जन्माला घालून वाऱ्यावर सोडली हे उघड होईल, अशा अतिशय बोचऱ्या शब्दांत दळवींनी तटकरेंवर हल्ला चढवला. नेहमी सर्व सत्ता आणि पदे स्वतःच्या घरात ठेवण्याची तटकरेंची प्रवृत्ती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसऱ्या बाजूला, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या व्यासपीठावरून आमदार महेंद्र थोरवे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. तटकरेंच्या राजकारणापासून गोगावले यांनी वेळीच सावध राहावे, असा सल्ला देत थोरवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून एकदा संघर्ष सुरू झाला की तो थांबणार नाही, असा निर्वाणीचा इशारा थोरवे यांनी भर मंचावरून दिला. शिंदेसेनेच्या दोन आमदारांनी एकाच वेळी तटकरेंविरोधात (Tatkare Family) उघडलेली ही तोफ पाहता महायुतीत निर्माण झालेली ही दरी आता आणखी रुंदावणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.






