प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पाबळ (ता. शिरुर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी चोऱ्या करुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.पाबळ येथील चौधरी वस्ती येथे राहणारे बापू चौधरी हे घरात झोपलेले असताना सकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील साहित्य अस्थाव्यस्त पडून घरातील सुटकेस गायब असल्याचे दिसले. दरम्यान, घरात पाहणी केली असता घरातील आईचे दागिने व सुटकेस गायब झाल्याचे दिसून आल्याने पाहणी केली. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरुन सुटकेस व आदी साहित्य घरामागे गवतात टाकून दिल्याचे समोर आले. याचवेळी चोरट्यांनी सुनील चौधरी यांच्या घरात चोरी करुन गावातील शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले. हवालदार संतोष शेळके, विशाल देशमुख यांसह आदींनी परिसरात पाहणी केली. याबाबत बापू नानाभाऊ चौधरी (रा. पिराचा मळा, चौधरी वस्ती पाबळ) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार संतोष शेळके हे करत आहे.