प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – येथील चाकण चौक परिसरातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिसांनी एका लॉज चालकासह तिघांवर गुन्हे दाखल केले असून, वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.शिक्रापूर येथील कृष्णा लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी लॉज चालकासह वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिला सापडल्या. पोलिसांनी लॉज चालक राम साकोरे, विजय हेडगे आणि गणेश दिलीप पौळ या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघींची महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.