Shikrapur Accident – पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. कासारी फाटा आणि कोंढापुरी परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये महेश धोंडीराम भगत आणि सचिन वसंत आडे या दोन दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनांनी धडक दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास महेश भगत हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १२ क्यूयू २४९७) अहिल्यानगर बाजूने पुण्याच्या दिशेने येत होते. कासारी फाटा येथील हॉटेल लकीसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. याच महामार्गावर दुसऱ्या घटनेत सचिन आडे हे आपल्या दुचाकीवरून (एमएच २६ बीझेड ६४१९) जात असताना कोंढापुरी येथे त्यांच्याही गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. दोन्ही अपघातातील जखमींना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत महेश धोंडीराम भगत (वय ४४, सध्या रा. मलठण फाटा, शिक्रापूर; मूळ रा. काले, ता. जुन्नर) आणि सचिन वसंत आडे (वय ३०, रा. रांजणगाव गणपती; मूळ रा. उमरी, जि. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पवन रामचंद्र चव्हाण आणि प्रवीण शंकर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस हवालदार किशोर तेलंग आणि अतुल पखाले या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार वाहन चालकांचा शोध घेतला जात आहे.