Shikrapur Accident | मद्यधुंद कंटेनरचालकाचा थरार ; तीन वाहनांचा चुराडा, दुकान उद्ध्वस्त..

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – रविवारी संध्याकाळी करंदी (ता. शिरूर) येथील भारत गॅस फाटा परिसरात अचानक भीषण गर्जना झाली. शिक्रापूर-चाकण रस्त्यावरून भरधाव वेगात धावणारा कंटेनर (एमएच ४६ बीएफ ४५१४) वेड्यासारखा झेपावत आला. सुकाणूवर बसलेला चालक मद्यधुंद अवस्थेत — डोळ्यांत लालसरपणा, हालचालीत ताळतंत्र नाही.रस्त्याच्या कडेला उभी असलेली फॉर्च्युनर कार (एमएच १२ एलएल ९१९२) पाठीमागूनच भयानक आवाजात चिरडली गेली.
क्षणभरात पुढील (एमएच १४ एफटी १६०९) पेगो आणि (एमएच १२ जिएल ४५३४) ही दुचाकीही लोखंडाखाली चिरडून निघाली. धाव घेणाऱ्या कंटेनरचा वेग थांबण्याआधीच समोरील प्रथमेश जनरल स्टोअर्स च्या लोखंडी शटरवर धाडकन आदळला — इतका जोर, की लोखंड वाकून आतल्या शेल्फवर ठेवलेला माल खाली कोसळला.धडका ऐकताच परिसरातील लोक घराबाहेर धावून आले. कुणी फोनवर पोलिसांना कळवत होते, तर कुणी ओरडत कंटेनरच्या दिशेने पळत होते. काहीजणांनी कंटेनरचे दरवाजे उघडून चालकाला बाहेर खेचले. श्वासात दारूचा तीव्र वास, डोळ्यांत नशेचे चिन्ह दृश्य पाहून लोकांनी संतापाने संतूराम नागरे (रा. केलसांगवी, जि. बीड) याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही माहिती मिळताच पोलीस हवालदार बापू हाडगळे आणि संदीप बनकर घटनास्थळी धावून आले. गोंधळलेली वाहतूक सुरळीत करत त्यांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले. फॉर्च्युनर कारचालक राजेंद्र सातव किरकोळ जखमी झाले असून तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. जखमी सातव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नागरे याच्यावर मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बनकर करत आहेत.




