Shigeru Ishiba : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा राजीनामा देण्यास नकार

टोकियो (जपान) : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. देशातील महागाई कमी करण्यासाठी आणि अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या भरमसाठ आयात शुल्कासारख्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपण पंतप्रधानपदावर कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रविवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहातल्या निम्म्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे सत्तारुढ आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.
संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये यापूर्वीच अल्पमतात असलेल्या इशिबा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता वरिष्ठ सभागृहातही अल्पमतात यावे लागले आहे. बहुमत टिकवण्यासाठी एकूण ७५ जागा सरकारला हव्या होत्या. त्यासाठी या निवडणुकीत ५० जागा जिंकण्याची आवश्यकता असताना सरकारला केवळ ४७ जागा जिंकण्यात यश आले आहे. तरिही लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे इशिबा यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली होती.
निवडणुकीचे निकाल आपण गाभीर्याने घेतले असून राजकीय पोळी निर्माण होऊ नये आणि अमेरिकेकडून १ ऑगस्टपासून लादण्यात येणार असलेल्या आयात शुल्कासारख्या आव्हानांना हाताळणे गरजेचे आहे, याला आपण प्राधान्य देत असल्याचे इशिबा यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या निकालाची जबाबदारी स्वीकारत असतानाच देशाबाबतची आपली जबाबदारी देखील आपल्याला पार पाडायची आहे. देशाला वाऱ्यावर सोडल्यासारखे होऊ नये, यासाठी आपण या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पंतप्रधानपदी कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जपानच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही इशिबा सरकारचा पराभव झाला आहे. त्यात आता वरिष्ठ सभागृहातही सरकारचा पराभव झाला आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि लोकप्रियता गमावलेल्या सरकारला भाववाढ आटोक्यात आणणे शक्य नाही. वेतनवाढ करणेही शक्य नाही. देशाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. तसे असतानाही विरोधकांकडून सरकारला जीवदान दिले जाते आहे.





