दौंडमध्ये खळबळ…! गिरीम येथे मेंढपाळाची अत्यंत क्रूरपणे हत्या; कु-हाडीने डोक्यावर केले वार

दौंड : दौंड तालुक्यातील गिरीम येथील बिरोबानगरमध्ये 25 जून रोजी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. 45 वर्षीय मेंढपाळ मोहन धुळा तालवर यांचा अज्ञात हल्लेखोराने कु-हाडी आणि लाकडी काठ्यांनी डोक्यावर व गळ्यावर वार करून निर्घृण खून केला.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक बिद्री तपास करीत आहेत. या प्रकरणाची फिर्याद मोहन यांचे बंधू सावळाराम धुळा तालवर (वय 32, रा. बिरोबानगर, गिरीम) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सावळाराम शेतात ऊसाचे पाचट पेटविण्यासाठी गेले होते. त्यानंतर दूध डेअरीत दूध घालून घरी परतले. दुपारी पुन्हा शेतातील पाचट गोळा करण्यासाठी ते बाहेर पडले असताना, त्यांचा पुतण्या गुलाब तालवर याने फोनवरून कळविले की, मोहन मेंढ्यांच्या मागे दिसत नाही आणि मेंढ्या दोन ते तीन किलोमीटर दूर गेल्या आहेत.
ही माहिती मिळताच सावळाराम यांनी आपल्या वहिनी कमल तालवर यांना याबाबत सांगितले आणि गिरीम गावच्या हद्दीतील डोंगर भागात मोहनचा शोध सुरू केला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास डोंगरात शोध घेत असताना, त्यांना मोहन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनास्थळी एक लोखंडी पात्याची कु-हाड आणि रक्ताने माखलेल्या दोन लाकडी काठ्या आढळून आल्या, ज्यामुळे हा हल्ला अत्यंत क्रूरपणे झाल्याचे स्पष्ट झाले.
सावळाराम यांनी तात्काळ पुतण्या अजित याच्या मदतीने नामदेव झिटे यांच्या चारचाकी गाडीतून मोहन यांना उपचारासाठी दौंड येथील महालक्ष्मी हॉस्पिटलकडे नेले. मात्र, वाटेतच मोहन यांची हालचाल थांबली. त्यानंतर त्यांना यवत येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या खळबळजनक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
अज्ञात हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास तीव्र केला असून, लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणाने गिरीम परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





