Sheikh Hasina : शेख हसीना यांना हवा नवीन पासपोर्ट; बांगलादेशात परतण्यासाठीच्या हालचाली सुरु
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र हवे आहे, असे त्यांच्या आवामी लीग पक्षाने म्हटले आहे.

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र हवे आहे, असे त्यांच्या आवामी लीग पक्षाने म्हटले आहे. पुढच्या महिन्यात शेख हसीना भारतातून बांगलादेशात परतण्याची तयारी करत असल्याचे यातून दिसून येते आहे.
शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र बांगलादेशातील हंगामी सरकारने रद्द केले आहे. त्यामुळे मॅट्रीक्स चेंबर्स या हसीना यांच्या लंडनस्थित वकिलांच्या फर्मने नवी दिल्ली येथील बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयाकडे या कागदपत्रांची लवकरात लवकर पुर्तता करण्याची मागणी केली आहे.
हसीना यांचे राष्ट्रीयत्व आणि आंतरराष्ट्रीय मानव हक्क करारानुसार देशाच्या कर्तव्याच्या आधीन राहून नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्राची मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षे भारतात राहिल्यानंतर बांगलादेशात परतण्यासाठी उचलण्यात येणारे हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे आवामी लीगने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बंगबंधूंच्या कन्येला आपल्या मातृभूमीकडे आणि आपल्या लोकांकडे परतण्यापासून रोखू शकत नाही, असेही आवामी लीगने म्हटले आहे. मात्र नवीन पासपोर्टची मागणी केवळ राजकीय हेतूने केली जात असल्याचे बांगलादेश (Sheikh Hasina) सरकारने म्हटले आहे.






