Padmini Kolhapure : वयाच्या २१ व्या वर्षी घरातून पळाल्या, शक्ती कपूर यांनी केलं कन्यादान; पद्मिनी कोल्हापुरेंच्या लग्नाची भन्नाट गोष्ट!
Padmini Kolhapure : मोजकेच चित्रपट करूनही त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज त्या चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी त्यांचं बॉलिवूडशी असलेलं नातं आजही कायम आहे.

Padmini Kolhapure : ‘प्रेम रोग’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा आज ६१ वा वाढदिवस. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र, त्याआधी बालकलाकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मोजकेच चित्रपट करूनही त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज त्या चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी त्यांचं बॉलिवूडशी असलेलं नातं आजही कायम आहे.
पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि वीणावादक पंढरीनाथ कोल्हापुरे आहेत. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही देव आनंद यांनी केली होती. त्यानंतर ‘साजन बिना सुहागन’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘इन्साफ का तराजू’ आणि ‘थोडी सी बेवफाई’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी काम केलं.
वयाच्या १६ व्या वर्षी मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण
पद्मिनी यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी दिग्दर्शक राज कपूर यांच्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘प्रेम रोग’मुळे त्या रातोरात लोकप्रिय झाल्या आणि त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सचा ओघ सुरू झाला.
यानंतर त्यांनी ‘सौतन’, ‘मरते दम तक’, ‘वो सात दिन’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘अहिस्ता अहिस्ता’, ‘प्यार झुकता नहीं’ आणि ‘विधाता’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केलं.
वयाच्या २१ व्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करून केलं लग्न
पद्मिनी कोल्हापुरे यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा झाली. १९८० च्या दशकात त्या चित्रपट निर्माते प्रदीप शर्मा यांच्या प्रेमात पडल्या. ‘ऐसा प्यार कहाँ’ (१९८६) या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. चित्रपटाच्या सेटवर झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात बदलली.
दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पद्मिनी यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत घरातून पळून जाऊन विवाह केला. त्यांच्या या निर्णयाची त्यावेळी बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा रंगली होती. या दाम्पत्याला प्रियांक शर्मा हा एक मुलगा आहे.
शक्ती कपूर यांनी केलं होतं कन्यादान
पद्मिनी कोल्हापुरे यांच्या लग्नातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे अभिनेता शक्ती कपूर यांनी त्यांचं कन्यादान केलं होतं. कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे लग्नात कन्यादान कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी शक्ती कपूर यांनी पुढाकार घेत ही जबाबदारी पार पाडली.
यामागचं कारणही तितकंच खास आहे. पद्मिनी कोल्हापुरे या शक्ती कपूर यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. म्हणजेच पद्मिनी या शक्ती कपूर यांच्या मेहुणी लागतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य म्हणून शक्ती कपूर यांनी त्यांच्या लग्नात कन्यादानाची भूमिका पार पाडली होती. आजही पद्मिनी कोल्हापुरे यांच्या लग्नाचा हा किस्सा बॉलिवूडमधील चर्चेचा विषय ठरतो.






