Sanjay Gupta : बॉलिवूडवर शोककळा! ‘शूटआउट अॅट वडाळा’च्या दिग्दर्शकाची मनाला चटका लावणारी एक्सिट
Sanjay Gupta : ३० ऑक्टोबरच्या रात्री घरातील बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Sanjay Gupta : मनोरंजनविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट अॅट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून, चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबरच्या रात्री घरातील बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संजय गुप्ता यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी संजय गुप्ता यांना आपला जवळचा मित्र आणि प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून संबोधत दुःख व्यक्त केले.
अॅक्शन आणि क्राइम थ्रिलर चित्रपटांची वेगळी ओळख
संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘जिंदा’, ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. अॅक्शन, थरार आणि मुंबईतील गुन्हेगारी जगताचे चित्रण ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती.
निर्मिती क्षेत्रातही उमटवला ठसा
दिग्दर्शनासोबतच संजय गुप्ता यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले. ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘प्लॅन’, ‘वुडस्टॉक व्हिला’, ‘अॅसिड फॅक्टरी’ आणि ‘पंख’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीशी ते जोडले गेले होते. त्यांच्या व्हाइट फेदर फिल्म्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातूनही अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली.
आपल्या वेगळ्या दिग्दर्शनशैलीमुळे संजय गुप्ता यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने बॉलिवूडने एक प्रतिभावान दिग्दर्शक गमावला आहे. संजय गुप्ता यांच्या निधनामुळे बॅालिवूडचे मोठं नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर त्यांना पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.





