Tejaswini Pandit Post : “मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी..”; आईच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने भावनांना केली मोकळी वाट

Tejaswini Pandit Post : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी पुण्यात निधन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यादरम्यान त्यांची दुपारी चार वाजता प्राणज्योत मालविली. त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आज रविवारी सकाळी ११ वाजता वैंकुठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आईच्या निधनाने अभिनेत्री तेजिस्विनी पंडित आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी चित्रपटातील छोट्याशा भूमिकेनं ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अभियन क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर अनेक मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर आपला कामाचा ठसा त्यांनी उमटविला. त्यांनी ‘सुंदर मी होणार’, ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या नाटकांमध्ये काम केलं आहे.
चांदेकर यांच्या गुडघ्यावर 2019 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून बाहेर पडल्यावर त्यांनी पुन्हा सक्रिय होऊन मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. रखेली’ हे त्यांचे गाजलेले नाटक होतं. त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘पाऊलवाट’, ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी केल्या होत्या.
तेजस्विनी पंडितची पोस्ट
नमस्कार, कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसंच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या 69 व्या वर्षी आज 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथं होणार आहेत’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.
पुरस्कारांनी सन्मानित
अभिनय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पुणे नाट्यपरिषदेतर्फे त्यांना ‘जीवनगौरव’ देण्यात आला होता. तसेच ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी त्यांना ‘झी गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
हेही वाचा : अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे मायभूमीत आगमन; दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत





