Shirur News : ‘हाताला फ्रॅक्चर होतं, मग मृत्यू कसा झाला?’ पतीचा संतप्त सवाल; शस्त्रक्रियेदरम्यान पत्नीचा मृत्यू
Shirur News : पूजा यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, शस्त्रक्रियेदरम्यान कोणती वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती, भूल देण्याच्या प्रक्रियेत काही अडचण आली होती का किंवा अन्य कोणते वैद्यकीय कारण होते, याबाबत सध्या अधिकृत निष्कर्ष उपलब्ध नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आणि पुढील वैद्यकीय तपासणीचा निष्कर्ष या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

शिरूर : शिरूर शहरातील बाबुरावनगर येथील कोळपे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान २८ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिरूर परिसरात खळबळ उडाली आहे. पूजा राहुल गई (वय २८, रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी वैद्यकीय उपचारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, “हाताच्या फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया होती, मग अचानक पत्नीचा मृत्यू कसा झाला?” असा संतप्त सवाल पती राहुल गई यांनी केला आहे.
पूजा यांना ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिरूर येथील कोळपे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सीटी स्कॅन व एक्स-रे केल्यानंतर हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले. त्यानुसार शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी पूजा यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही तासांतच परिस्थिती अचानक गंभीर बनली आणि दुपारी सुमारे २ वाजता पूजा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.
पूजा यांचे पती राहुल गई यांनी या घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया सुरू असताना काही वेळाने ऑपरेशन थिएटरच्या परिसरात गडबड जाणवली. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा ठोठावला; मात्र त्यावेळी त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. अखेर सुमारे तीन तासांनंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
“माझ्या पत्नीला केवळ हाताला फ्रॅक्चर झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात आणले आणि ऑपरेशनच्या वेळी तिचा मृत्यू झाला. नेमके काय झाले, हे आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले पाहिजे.” अशी भूमिका राहुल गई यांनी घेतली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांच्या उपचारपद्धतीबाबत संशय व्यक्त केला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, पूजा यांच्या मृत्यूमागे वैद्यकीय निष्काळजीपणा होता की अन्य वैद्यकीय कारण, हे अधिकृत तपास व शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेची शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन प्रक्रिया कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पूजा यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, शस्त्रक्रियेदरम्यान कोणती वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती, भूल देण्याच्या प्रक्रियेत काही अडचण आली होती का किंवा अन्य कोणते वैद्यकीय कारण होते, याबाबत सध्या अधिकृत निष्कर्ष उपलब्ध नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आणि पुढील वैद्यकीय तपासणीचा निष्कर्ष या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सुशांत कुटे यांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. “पूजा यांच्या कुटुंबाला घटनेमागील सत्य समजले पाहिजे. तपास व शवविच्छेदनाचा अहवाल पूर्णपणे निष्पक्ष असावा आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
पूजा यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांचा मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेले गई कुटुंब उदरनिर्वाहासाठी रांजणगाव गणपती परिसरात राहत असल्याचे सांगण्यात आले. पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे पती राहुल गई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या तरुण महिलेचा काही तासांत मृत्यू झाल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांपेक्षा वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासातून सत्य समोर येणे महत्त्वाचे आहे. पूजा यांच्या मृत्यूला नेमके कारण काय, याचा उलगडा होऊन कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





