Shaurya Din 2026: १ जानेवारीला जयस्तंभाचे रूप पालटणार; पाहा यंदा काय असणार आहे खास सजावट?

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२६ रोजी २०८ वा शौर्यदिन साजरा होत असताना, यावर्षी जयस्तंभाला अत्यंत आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीने या सजावटीमध्ये भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र, अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि राजमुद्रेचा समावेश असणार आहे.
कोरेगाव भीमा शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे व रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही सजावट साकारली जात आहे. या सजावटीमध्ये जयस्तंभाला पंचशीलच्या चौकटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन फोटो आणि दोन राजमुद्रा लावण्यात येणार आहेत.
त्यावर ‘न्याय व स्वातंत्र्य’ या ब्रीदवाक्यासह तिरंगा ध्वजाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.या सजावटीत वापरण्यात आलेला गडद निळा रंग हा समतेचे प्रतीक म्हणून निवडला गेला आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक जयस्तंभाला दिलेल्या भेटीदरम्यानचा विशेष फोटो देखील यावर्षीच्या सजावटीचा मुख्य भाग असणार आहे. शौर्यदिनाच्या निमित्ताने होणारी ही भव्य सजावट यावर्षीच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती राहुल डंबाळे यांनी दिली आहे.





