Shaurya Ambure Bronze : गुडघ्याची सर्जरी, ट्रायलमध्ये पडली अन् डकारमध्ये थेट तिरंगा फडकवला! महाराष्ट्राच्या १७ वर्षीय लेकीचा युवा ऑलिम्पिकमध्ये करिष्मा
Shaurya Ambure Bronze : गुडघ्याच्या गंभीर दुखापतीच्या (ACL) आणि शस्त्रक्रियेच्या वेदनांवर मात करून, धावपटू शौर्य अंबुरेने डकार युवा ऑलिम्पिक २०२६ मध्ये १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला.

Shaurya Ambure Wins Bronze Dakar Youth Olympics 100m Hurdles : जिद्द आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर नशिबालाही झुकावे लागते, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या १७ वर्षीय कन्या शौर्या अंबुरेने आंतरराष्ट्रीय मंचावर आणून दिला आहे. सेनेगलची राजधानी डकार येथे आयोजित युवा ऑलिम्पिक २०२६ (Youth Olympics) मध्ये शौर्याने महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत (100m Hurdles) कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. या शर्यतीत तिने १३.५९ सेकंदांची नोंद करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम (Personal Best) वेळ नोंदवली. विशेष म्हणजे, या जागतिक स्पर्धेत सहभागी होणारी शौर्या ही भारताची एकमेव ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट होती.
एसीएलची गंभीर दुखापत अन् ९ महिन्यांचा खडतर रिहॅब –
शौर्यासाठी पोडियमवर पाऊल ठेवण्याचा हा प्रवास एखाद्या थरारक चित्रपटासारखा राहिला आहे. गेल्या वर्षी एशियन यूथ गेम्समध्ये दोन पदके जिंकून ती जबरदस्त फॉर्ममध्ये असताना तिच्या उजव्या गुडघ्याचा एसीएल (ACL) लिगामेंट तुटला. त्यानंतर तिला तातडीने मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. सर्व स्वप्ने धुळीस मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र शौर्याने हार मानली नाही. तब्बल ९ ते १० महिने अत्यंत वेदनादायी रिहॅबिलिटेशन आणि कठीण शारीरिक कसरतींचा सामना करत तिने ट्रॅकवर जोरदार पुनरागमन केले.
ट्रायलमध्ये नवव्या अडथळ्याला धडकून पडली; नशिबाने दिली दुसरी संधी
🏃♀️ SHAURYA AMBURE BAGGED BRONZE WITH A NEW PERSONAL BEST
Shaurya Avinash Ambure clocked a new Personal Best time of 13.59 sec to win BRONZE🥉 in Women’s 100m Hurdles at the Youth Olympics.
Medal tally – 0🥇3🥈5🥉 https://t.co/inuBjDqtrf
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) November 8, 2026
शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रीय निवड चाचणीत (Trials) उतरलेल्या शौर्यासोबत मोठा अपघात घडला. शर्यतीच्या नवव्या हर्डलला धडकल्याने ती ट्रॅकवर पडली आणि रेसमधून बाहेर झाल्याने तिची निवड हुकली. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे बंगळुरू येथे पुन्हा चाचणी घेण्याचा निर्णय झाला. नशिबाने मिळालेल्या या दुसऱ्या संधीचे तिने सोने केले आणि थेट युवा ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले.
०.०२ सेकंदाने हुकले रौप्य, पण कांस्य जिंकून रचला इतिहास
INDIA’S FIRST ATHLETICS MEDAL AT YOUTH OLYMPICS GAMES 2026! 🇮🇳🥉
Shourya Avinash Ambure clinches Bronze Medal in the Women’s Hurdles 100m Final
She clocked a PB of 13.59 seconds! 🔥 🔥🔥 https://t.co/gVD08ANfB4
— The Khel India (@TheKhelIndia) November 9, 2026
डकारमधील अंतिम फेरीत शौर्याने १३.५९ सेकंदात अंतर कापत तिरंगा फडकावला. चीनच्या झांग केईने १३.१७ सेकंदांसह सुवर्ण तर फ्रान्सच्या अण्णा पीटर्सने १३.५७ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. शौर्याचे रौप्यपदक अवघ्या ०.०२ सेकंदांच्या फरकाने हुकले असले, तरी गंभीर दुखापतीवर मात करून तिने जिंकलेले हे पदक सुवर्णापेक्षा कमी नाही. आशियाई अंडर-१८ आणि एशियन यूथ गेम्सनंतर आता युवा ऑलिम्पिक पदकावर नाव कोरून तिने महाराष्ट्राची मान उंचावली आहे.





