David Warner Sandpapergate : ‘सँडपेपरगेट प्रकरणात उस्मान ख्वाजाने जे सांगितले ते १००% खरे!’ डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या चौकशीवर उपस्थित केले प्रश्न
David Warner Sandpapergate : डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने 'सँडपेपरगेट' बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

David Warner Backs Usman Khawaja Claims On 2018 Sandpapergate Scandal : ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील अत्यंत कुप्रसिद्ध आणि वादग्रस्त असे २०१८ मधील ‘सँडपेपरगेट’ बॉल टॅम्परिंग प्रकरण आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माजी सलामीवीर उस्मान ख्वाजाने आपल्या ‘सब्र’ (Sabr) या पुस्तकातून केलेल्या स्फोटक दाव्यानंतर आता या प्रकरणात एका वर्षाची बंदी भोगणारा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नर उघडपणे ख्वाजाच्या समर्थनात पुढे आला आहे. तत्कालीन ऑस्ट्रेलियन संघातील प्रत्येकालाच या कटाची माहिती होती हा ख्वाजाचा दावा १०० टक्के खरा असल्याचे सांगत वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उस्मान ख्वाजाचे आभार; वॉर्नरने उघडपणे दिली दाव्याला साथ
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ शेअर करत वॉर्नरने ख्वाजाचे जाहीर आभार मानले. वॉर्नर म्हणाला, “या विषयावर बोलून मला आठ वर्षे झाली आहेत. उझी (उस्मान ख्वाजा), मी तुला पूर्ण पाठिंबा देतो. तू जे काही समोर आणलेस ते १०० टक्के सत्य आहे. सर्वांना खरी वस्तुस्थिती माहीत होती, पण आज अखेर ते सत्य जगासमोर आले आहे. लोकांना याबाबत जाणून घ्यायचे होते आणि तू ते धाडस दाखवलेस.” तत्कालीन प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी ख्वाजाचे दावे फेटाळले असले, तरी वॉर्नरच्या थेट सहमतीमुळे या वादाला आता स्फोटक वळण मिळाले आहे.
आठ वर्षांपूर्वीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह; ‘निष्पक्ष तपास कसा झाला?’
यावेळी वॉर्नरने २०१८ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीच्या पारदर्शकतेवर थेट बोट ठेवले. तो म्हणाला, “उस्मानने त्या दिवशी घडलेल्या प्रत्येक घटनेची अगदी जवळून नोंद ठेवली होती. तो ड्रेसिंग रूममध्ये कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या अगदी शेजारी बसला होता. अशा वेळी संपूर्ण संघाला वगळून केवळ तीनच खेळाडूंना दोषी ठरवणारी ती चौकशी सखोल आणि निष्पक्ष कशी असू शकते? आम्ही कोणावर आरोप करण्यासाठी किंवा जुन्या जखमा उकरण्यासाठी बोलत नसून, या प्रकरणात खरी जबाबदारी आणि पारदर्शकता समोर येणे आवश्यक आहे.”
‘आम्ही रडत का होतो?’; मुलींना सत्य सांगताना वॉर्नर झाला भावूक
View this post on Instagram
गेल्या आठ वर्षांत प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली गेल्याचे सांगत वॉर्नरने आपल्या कौटुंबिक वेदनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, “गेल्या काही दिवसांत मी माझ्या मुलींशी या विषयावर सविस्तर बोललो. त्यावेळी आम्ही तिला जवळ का घेतले होते, तिथे इतके कॅमेरे का होते आणि आम्ही का रडत होतो, हे लहान मुलीला समजावणे अत्यंत कठीण होते. मात्र, मी तिला सांगितले की नेहमी खरे बोला, कारण खोट्याचा बुरखा कधी ना कधी फाटतोच.” या प्रकरणामुळे आपल्या कुटुंबाला आणि स्मिथ-बॅनक्रॉफ्टच्या परिवाराला अतोनात त्रास सहन करावा लागल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात पुन्हा भूकंप; बॅनक्रॉफ्ट, स्मिथ आणि वॉर्नरचा बळी?
‘I made a promise to my childhood friend Davey Warner that I would tell the truth.’
Usman Khawaja’s sandpapergate revelations are sparking plenty of debate but I think it’s worth watching his explanation on instagram. 👇 https://t.co/CIawBRSNPo
— Mark Gottlieb (@MarkGottlieb) November 7, 2026
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ च्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी केवळ स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या तिघांवरच बंदीची कठोर कारवाई करण्यात आली होती. मात्र, ख्वाजापाठोपाठ आता वॉर्नरनेही संपूर्ण संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केल्यामुळे, इतर वरिष्ठ खेळाडूंना आणि तत्कालीन व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी या तिघांनाच बळीचा बकरा बनवण्यात आला होता का, असा प्रश्न आता पुन्हा एकदा क्रिकेट जगतात उफाळून आला आहे.





