Shashikant Shinde – पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार नागराज कदम आणि अक्षय शिंदे यांच्या कार्यपद्धतीवरून सोमवारी विधानभवनात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. या विषयावर सभागृहात घमासान चर्चा झाली. आ. शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेला काँग्रेसचे आ. भाई जगताप यांनीही पाठिंबा देत पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सरकारच्यावतीने गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कारवाई करू, असे साचेबंद उत्तर दिल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आणि सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेरीस उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत चर्चेवर पडदा टाकला. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबत अधिवेशनात वारंवार प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगत आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. सरकार केवळ चौकशीचे अहवाल आणि कागदपत्रे सादर करून सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाचा संदर्भ देत चौकशीदरम्यान ज्या व्यक्तीला पोलीस निरीक्षकांनी मोबाइलवरून कॉल केला होता., त्या व्यक्तीचे निवेदन सभागृहात वाचून दाखवले. त्यानंतर बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध उदाहरणे देत त्यांनी सरकारला थेट सवाल केला. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलीस महासंचालकांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या संदर्भात अहवाल सादर केला असल्याचे सांगितले. अहवालानुसार संबंधित पोलीस निरीक्षकांचे कामकाज चांगले असून त्यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र हे उत्तर ऐकताच आमदार शशिकांत शिंदे संतप्त झाले. सरकारमध्ये हिंमत असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून दाखवा, असे आव्हान देत त्यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले.