प्रभात वृत्तसेवा सातारा – शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या हक्काचा आवाज म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक लढ्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या झुंजार कार्याचा, ठाम विचारांचा आणि अखंड जनसेवेचा गौरव करत आहे. आमदार शिंदे म्हणजे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढा देणारे, सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसोबत थेट संवाद साधणारे आणि राजकीय सत्तेच्या मोहाला कधीही बळी न पडणारे नेतृत्व म्हणजे आमदार शशिकांत शिंदे. त्यांनी महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेला नवी धार दिली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते कै. राजारामबापू पाटील यांच्याविषयी भाजपच्या आमदारांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संपूर्ण सांगली पेटून उठला आणि त्या आगीला दिशा दिली ती आमदार शशिकांत शिंदे यांनीच. सांगलीच्या इतिहासात प्रथमच इतक्या विराट प्रमाणावर जनआक्रोशाचे नेतृत्व त्यांनी केले आणि हे नेतृत्व केवळ पक्षापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण जनतेच्या आत्मसन्मानाचा प्रश्न बनले होते. विचारांनी आणि वागण्याने वेगळे – राजकारणात अनेक जण पदे आणि सत्तेच्या मागे धावतात. पण आमदार शशिकांत शिंदे यांनी नेहमीच विचार आणि मूल्ये यांचा आग्रह धरला. त्यांच्या भाषणातील ज्वलंत विचार, अभ्यासपूर्ण मुद्दे आणि थेट जनतेच्या मनाला भिडणारा शब्दप्रहार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सभागृहात असो किंवा रस्त्यावरच्या आंदोलनात त्यांच्या प्रत्येक कृतीत एकाच गोष्टीचा प्रतिबिंब दिसते, ते म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष. त्यांच्या वक्तृत्वात अशी ताकद आहे की माइक असो वा नसो, हजारो लोकांच्या गर्दीतही त्यांचा आवाज काळजाच्या तळापर्यंत पोहोचतो. भक्कम विचारसरणी, पीळदार शरीरयष्टी आणि निर्भीड वाणी या तिन्ही गुणांचा आदर्श संगम म्हणजे आमदार शशिकांत शिंदे. शेतकरी- कष्टकरी जनतेचे खरे नेतृत्व- महागाईविरोधातील लढा असो, अथवा शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा सेझविरोधी आंदोलन असो, बेळगाव सीमा प्रश्न असो, किंवा पुणे–बंगळुरू आशियाई महामार्गावरील टोलमुक्तीची लढाई. आमदार शशिकांत शिंदे नेहमी अग्रस्थानी राहिले. त्यांनी कधीच जाती, पक्ष, सत्ताधारी, विरोधक अशा चौकटींची पर्वा केली नाही. फक्त सत्य आणि न्यायासाठीचा संघर्ष त्यांना महत्त्वाचा वाटतो. जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता- सामान्य माणसांच्या दुःखाशी नाळ जोडून त्यावर ठोस उपाय सुचवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते केवळ विधिमंडळातील नेते नाहीत, तर जनतेच्या मनातील आमदार आहेत. राजकारणात अनेक जण आश्वासने देतात. पण आमदार शशिकांत शिंदे यांनी ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहेत. त्यांच्या कार्यकाळात जलसंपदा मंत्री म्हणून केलेले काम आजही पश्चिम महाराष्ट्रातील जनता अभिमानाने स्मरते. मूल्यनिष्ठ आणि वैचारिक भूमिका- छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल ते आजही पेटती ठेवत आहेत. त्यांची राजकारणातील दिशा ही सत्तेची नव्हे, तर सेवेची आहे. राष्ट्रवादी विचारधारेशी ते एकनिष्ठ राहिले आणि तिच्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही.